*मुक्ताईनगर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ₹५० हजारांची मदत द्या*
दीर्घ पावसाच्या खंडामुळे शेतकरी संकटात; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
उप संपादक | प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुक्यात पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन सादर केले. पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच पिकांना आवश्यक काळात पुरेसा पाऊस न मिळाल्याने केळी, कापूस, मका, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, तीळ यांसह विविध हंगामी व बागायती पिकांवर मोठा परिणाम झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी तसेच सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांची वाढ खुंटली असून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वाढते कर्जबाजारीपण आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी कुटुंबांवर गंभीर परिस्थिती ओढवण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली.
या आहेत प्रमुख मागण्या
मुक्ताईनगर तालुक्यातील सद्यस्थितीची तातडीने पाहणी करून दुष्काळसदृश किंवा कोरडी परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. तालुक्यातील सर्व गावांमधील शेतशिवारांची प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही अनावश्यक अट न लावता सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यावर जमा करावी. प्रलंबित पीक विम्याची नुकसानभरपाई पात्र शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावी. चालू वर्षातील पीक विम्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी.
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कर्जमाफी करावी अथवा कर्जवसुलीस स्थगिती द्यावी. सिंचनासाठी सुरळीत व मुबलक वीजपुरवठा करावा. नादुरुस्त किंवा अपुऱ्या क्षमतेच्या डीपी तातडीने दुरुस्त करून आवश्यकतेनुसार नवीन डीपी उपलब्ध करून द्याव्यात.
ई-पिक पाहणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. दुष्काळी परिस्थितीचा विद्यार्थ्यांवर होणारा आर्थिक परिणाम लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी व आवश्यक शैक्षणिक सवलती द्याव्यात.
याशिवाय जनावरांसाठी पुरेसा चारा व पाण्याची व्यवस्था करावी, तसेच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. तालुक्यातील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून विशेष आर्थिक मदतीसाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. वरील मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी ॲड. राहुल अशोक पाटील (तालुका प्रमुख, मुक्ताईनगर), ॲड. देवेंद्र बोदडे (तालुका समन्वयक), ॲड. अशोक बोदडे (तालुका प्रसिद्धी प्रमुख), अक्षय पालवे व वसीम मन्सुरी (तालुका संघटक) आदी उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रती तालुका कृषी अधिकारी, मुक्ताईनगर; जिल्हाधिकारी, जळगाव तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांना देण्यात आल्या आहेत.
“बळीराजा वाचवा – शेतकरी वाचवा – शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.







