हडपसर दारूकांडातील आरोपी उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
उरुळी कांचन पोलिसांची पुणे ग्रामीण व सीआयडी पुणे यांच्या संयुक्त कारवाईत मोठी कामगिरी
उरुळी कांचन : हडपसर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ३७९/२०२६ तसेच दापोडी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ११४/२०२६ मधील भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, १२३, १२५ अन्वये पाहिजे असलेला आरोपी दत्ता उर्फ भावड्या भिमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) याला उरुळी कांचन पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गुन्ह्यात पुणे शहर हद्दीत बेकायदा दारू सेवनामुळे मोठ्या प्रमाणावर बळी गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी दत्ता उर्फ भावड्या भिमराव लोंढे हा शिंदवणे व शिंदवणे घाट परिसरात आला असल्याची तसेच तो वारंवार वेषांतर करून व रूप बदलून फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक साफकत अमना, सीआयडी पुणे घटकाचे अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.
आरोपी हा राजेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे वेषांतर करून तसेच वाहनाची नंबर प्लेट बदलून तेथून पुढे जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची ओळख पटवून त्याला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
ही कारवाई उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ शिंदे तसेच पोलीस कर्मचारी रमेश भोसले, सोमनाथ चितारे, सचिन जगताप, कमलेश होळे, अक्षय कामटे, ऋषिकेश रासकर, संजय दाणे आणि सोमनाथ सुपेकर यांच्या पथकाने केली.
आरोपीला पुढील तपासासाठी सीआयडी पुणे पथकाचे प्रमुख डी.वाय.एस.पी. शामराव काळे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सीआयडी पुणे पथकाकडून सुरू आहे.








