शिरूर, ता. 13 जुलै : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आलेगाव पागा येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर शिरूर पोलिसांनी कारवाई करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
याप्रकरणी पोलीस अंमलदार ईश्वर रावसाहेब चव्हाण (बकल नं. 341) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यावरून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 641/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 11 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मौजे आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे येथील पांडुरंग रघुनाथ कोकरे याच्या राहत्या घरासमोरील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला गावठी हातभट्टीची तयार दारू विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करताना आरोपीकडून 10 लिटर क्षमतेच्या पांढऱ्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये सुमारे 9 लिटर आंबट व उग्र वासाची गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत 900 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात आरोपी पांडुरंग रघुनाथ कोकरे (रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे) यास बीएनएसएस कलम 35(3) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार आरोपीविरुद्ध यापूर्वीही शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 208/2007 अन्वये भादंवि कलम 324, 323, 504, 506, 147, 148 व 149 अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार (बकल नं. 398) करीत आहेत. ही कारवाई प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.








