*जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सराईत आरोपी अटकेत, ३५ हजारांचे गावठी पिस्तूल जप्त*
उप संपादक | प्रणित काठोके
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई करत एका फरार आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ₹३५ हजार किमतीचे गावठी पिस्तूल (मॅगझीनसह) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना १ जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, विजय वसंत अहिरे उर्फ भोमपाळी (वय ३२, रा. बोंदे विहारजवळ, गेंडालाल मिल परिसर, जळगाव) हा लोकवस्तीच्या परिसरात विनापरवाना गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व त्यांच्या पथकाने शिवाजीनगर परिसरातील गेंडालाल मिलजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान आरोपीकडून ₹३५ हजार किंमतीचे सिल्व्हर रंगाचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल (मॅगझीनसह) जप्त करण्यात आले. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय अहिरे याच्याविरुद्ध यापूर्वी खूनाचा प्रयत्न, दरोड्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मारहाण, दंगल, शस्त्र कायदा आदी गंभीर स्वरूपाचे एकूण ८ गुन्हे जळगाव शहर व एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.








