फत्तेपूर हद्दीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; १५ पैकी १४ आरोपी जेरबंद
उप संपादक | प्रणित काठोके
जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अत्यंत गंभीर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई करत १५ पैकी १४ आरोपींना अटक केली असून, परिसरात सध्या पूर्णपणे शांतता असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २ जून २०२६ रोजी देऊळगाव–कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात ४० वर्षीय महिला तिच्या परिचयातील मित्रासोबत बसलेली असताना, तेथे १५ जणांचा समूह आला. त्यांनी दोघांना धमकावत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान काही सहआरोपींनी संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचेही तपासात समोर आले आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले. माहिती मिळताच फत्तेपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला.
या प्रकरणात फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४१/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१), ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ व ६७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
या प्रकरणातील एकूण १५ आरोपींपैकी १४ मुख्य व सहआरोपींना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फत्तेपूर पोलीस करीत आहेत.








