पिंपरखेड येथे अज्ञात चोरट्याने १ लाख २८ हजार ७०० रुपयांच्या कॉपर केबलची चोरी
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पिंपरखेड येथील घोडनदी पात्रालगत पाटीलवस्ती परिसरातून अज्ञात चोरट्याने १६ शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या कॉपर केबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सोमनाथ बाळू बोंबे (वय ३३ वर्षे, व्यवसाय शेती, रा. पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
दिनांक २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते २७ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान पिंपरखेड गावच्या हद्दीतील घोडनदी पात्रालगत पाटीलवस्ती येथून अज्ञात चोरट्याने शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींना जोडलेल्या कॉपर केबल चोरी केल्या.
चोरून नेलेल्या केबलमध्ये फिर्यादी यांच्यासह परिसरातील शेतकरी दिनकर सदाशिव शेळके, कारभारी रामू ढोमे, विनायक कोंडीबा ढोमे, कैलास बाजीराव बोंबे, सतीश बाळू शेळके, मोतीराम तुकाराम डुकरे, बाळू बबन कोयमहाले, संदीप सुदाम बोंबे, नवनाथ विठ्ठल दाभाडे, अजित भास्कर शिंदे, तान्हाजी जाधव, रामदास सावळेराम बोंबे, भिमाजी सिताराम गायकवाड, मुरलीधर गेणभाऊ बोंबे व पोपट यशवंत बोंबे यांच्या केबलचा समावेश आहे.
एकूण ४२९० फुट लांबीची कॉपर केबल असून तिची अंदाजे किंमत १ लाख २८ हजार ७०० रुपये आहे.
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५९१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३२४(४) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील तपास पोलीस हवालदार गवळी व पोलीस हवालदार मुंडे हे करत आहेत.








