पत्रकारांना धमकी व शिवीगाळ प्रकरणी दौंड तालुका मराठी पत्रकार संघाचे यवत पोलीस ठाण्यात निवेदन
प्रतिनिधी – अविनाश लोंढे
मुंबई येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी कथितरित्या केलेल्या शिवीगाळ, धमक्या व आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करत दौंड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात पत्रकारांविषयी अपमानास्पद भाषा वापरणे ही लोकशाहीतील चौथ्या स्तंभाचा अवमान करणारी बाब असून, संबंधित घटनेची सखोल चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असून, लोकप्रतिनिधींनी जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी दौंड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप सोनवणे, सचिव संदीप भालेराव, बाळासाहेब मुळीक, उपाध्यक्ष गौरव दिवेकर, मनोजकुमार कांबळे, संदीप चव्हाण, अविनाश लोंढे, राहुलकुमार बिचकुले, दत्तात्रय डाडर, विठ्ठल थोरात यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांचा सन्मान अबाधित राहावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली.








