निमोणे येथे शिरूर पोलिसांची दारूबंदी कारवाई;
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे निमोणे गावच्या भोसेवाडी परिसरात घोडनदी किनारी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन व साहित्य असा एकूण ४३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२३ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क), (फ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार नितेश दत्तात्रय थोरात (ब.नं. २५८९), नेमणूक शिरूर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ जून २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास निमोणे गावच्या हद्दीतील भोसेवाडी घोडनदी किनारी आरोपी पिंटू नघु गव्हाणे व अतुल गिऱ्हे (दोघे रा. दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हे संगनमताने गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन साठवून दारू गाळप करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
या कारवाईत पोलिसांनी लोखंडी बॅरलमधील जळके रसायन, गुळमिश्रीत गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू तसेच दारूभट्टीसाठी लागणारे साहित्य असा एकूण ४३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करत आहेत.








