चाळीसगाव कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठी कारवाई; घरातून 19 तलवारींसह 11 घातक शस्त्रे जप्त
उपसंपादक | प्रणित काठोके
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशन अंतर्गत चाळीसगाव शहरात मोठी कारवाई करण्यात आली असून एका घरातून मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस तपासाला वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ नगर, चाळीसगाव येथील रहिवासी आरती किरण देठे (वय 37) यांच्या घरात अवैधरित्या शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता घराची झडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांना तब्बल 19 तलवारी तसेच 11 इतर घातक शस्त्रे जप्त करण्यात यश आले. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये चॉपर, चाकू व गुप्ती यांचा समावेश आहे.
पोलीसांनी तात्काळ हा संपूर्ण शस्त्रसाठा ताब्यात घेतला असून संबंधित व्यक्तीकडे या शस्त्रांबाबत चौकशी सुरू केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे घरात कशासाठी ठेवण्यात आली होती, ती कुठून आणण्यात आली, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का तसेच या शस्त्रांचा वापर कोणत्या बेकायदेशीर कृत्यासाठी होणार होता का याचा सखोल तपास पोलीसांकडून केला जात आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत असून गुन्हेगार, अवैध शस्त्रधारक व संशयित व्यक्तींवर करडी नजर ठेवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास चाळीसगाव पोलीस करीत आहेत. तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








