आमदार एकनाथराव खडसे यांनी मांडला शिरपूर ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा; राज्य सरकारची कारवाईची माहिती
उप संपादक | प्रणित काठोके
धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात उघडकीस आलेल्या अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणावर आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले. या प्रश्नाला उत्तर देताना शासनाने संबंधित प्रकरणासह राज्यातील अमली पदार्थविरोधी मोहिमेची माहिती सभागृहात सादर केली.
शासनाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये शिरपूर शहरातील शहादा फाटा परिसरात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एका संशयित व्यक्तीकडून सुमारे २०.८४ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एमडी) सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. जप्त मालाची किंमत अंदाजे ४ लाख १६ हजार ७०० रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान एकूण सहा आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणात ४ जून २०२६ रोजी न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादरम्यान सांगितले की, राज्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. याच अनुषंगाने ३१ ऑगस्ट २०२३ रोजी अमली पदार्थ विरोधी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
शासनाच्या आकडेवारीनुसार, २०२५ या वर्षात विशेष मोहिमांद्वारे आणि विविध पोलीस यंत्रणांच्या कारवाईतून तब्बल ५२३ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. तसेच जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत राज्यभरात अमली पदार्थ बाळगणे व तस्करीसंदर्भात १,१४२ गुन्हे नोंदविण्यात आले असून १,६२६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत सुमारे २५४.५३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहितीही शासनाने दिली.
अमली पदार्थांची लागवड, उत्पादन, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या धोरणानुसार विविध विभागांच्या समन्वयातून विशेष मोहिमा राबविण्यात येत असल्याचेही शासनाने स्पष्ट केले.








