जळगाव पोलिसांची विशेष मोहीम; टवाळखोर, मद्यपी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
जळगाव उप संपादक | प्रणित काठोके
जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जळगाव पोलीस दलाकडून विशेष तपासणी व कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी अचानक तपासण्या करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस प्रशासनाकडून वाईन शॉपसमोर, मोकळ्या मैदानांमध्ये, खाद्यपदार्थांच्या स्टॉलजवळ तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून बसणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवले जात असून अशा व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे.
याशिवाय शाळा, महाविद्यालये व खासगी क्लासेस परिसरात सायंकाळच्या वेळेत विशेष गस्त वाढविण्यात आली आहे. भरधाव वेगाने वाहने चालविणारे, विद्यार्थ्यांना त्रास देणारे टवाळखोर तसेच बुलेटसारख्या दुचाकींना अवैध सायलेंसर बसवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाई केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील परवाना नसलेल्या हॉटेल्स व धाब्यांमध्ये मद्यपान करणाऱ्यांची तपासणी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांची माहिती संबंधित विभागांना पाठविण्यात येत आहे.
दरम्यान, ओयो हॉटेल्स व इतर लॉजिंग ठिकाणांची तपासणी करून अल्पवयीन मुला-मुलींच्या वावराबाबत पडताळणी केली जात आहे. संशयास्पद प्रकरणे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील विविध कॅफे आणि युवकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणांचीही तपासणी सुरू असून नियमभंग, अवैध कृत्ये किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ कारवाई केली जात आहे.
तसेच शाळा व महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरातील पानटपऱ्या, तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून कोटपा (COTPA) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले असून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, ध्वनीप्रदूषण, वाहतूक नियमांचे उल्लंघन व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.








