शिक्रापूर येथील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई; नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेबाबतच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या कालावधीत संघटित गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तसेच जामिनावर मुक्त होऊन पुन्हा गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या नोंदी अद्ययावत करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीपसिंग गिल यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोरेगाव भीमा, तालुका शिरूर येथील गणेश भाऊसाहेब फडतरे, वय ३४ वर्षे, याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
सदर आरोपीविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमविणे, कट रचणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, जाळपोळ करणे, लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अवैध शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी दुखापत करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर प्रस्तावाचे अवलोकन करून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी तो प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला होता.
जिल्हाधिकारी यांनी गणेश भाऊसाहेब फडतरे याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे लक्षात घेऊन त्याला अशा प्रकारच्या कृत्यांपासून प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने स्थानबद्धतेचा आदेश काढला.
त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन दिनांक २०/०६/२०२६ रोजी त्याला ताब्यात घेतले व नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. दिपरतन गायकवाड, नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत ही कारवाई केली.








