जळगाव पोलिस दलाचा ‘धुरंधर’ गुन्हे शोधक प्रशिक्षणासाठी हरियाणाकडे रवाना
उप संपादक | प्रणित काठोके
जळगाव जिल्हा पोलिस दलातील “धुरंधर” हे श्वान विशेष गुन्हे शोधक (Crime Detection) प्रशिक्षणासाठी हरियाणातील पंचकुला येथे रवाना झाले आहे. बेल्जियन मालिनोज (Belgian Malinois) या अत्यंत बुद्धिमान आणि चपळ जातीचा असलेला धुरंधर भविष्यात गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा माग काढणे आणि विविध गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना मोलाची मदत करणार आहे.
धुरंधरचा जन्म 10 नोव्हेंबर 2025 रोजी झाला असून सध्या त्याचे वय 7 महिने 9 दिवस आहे. त्याला इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) यांच्या हरियाणातील पंचकुला येथील नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्ज अँड ॲनिमल्स (NTCD&A) येथे 9 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणादरम्यान धुरंधरसोबत प्रथम हस्तक हेड कॉन्स्टेबल भट्टू पाटील (Hc 2988) आणि द्वितीय हस्तक पोलीस कॉन्स्टेबल हंसराज देशमुख (Pc 1167) हेही उपस्थित राहणार आहेत.
तीन महिने आज्ञापालन, सहा महिने गुन्हे शोधक प्रशिक्षण
प्रशिक्षणाच्या पहिल्या तीन महिन्यांत धुरंधरला ओबीडीयन्स (Obedience) म्हणजे आज्ञापालनाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतरच्या सहा महिन्यांत त्याला वास ओळखणे (Smelling Work), आरोपींचा माग काढणे (Tracking), ओळख परेड (Identification Parade), ड्रॉप अँड फाइंड आणि विविध प्रकारच्या वासांद्वारे पुरावे व संशयित शोधण्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल.
देशातील अग्रगण्य श्वान प्रशिक्षण केंद्र
पंचकुला (भानू) येथील ITBP चे नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्ज अँड ॲनिमल्स हे देशातील अग्रगण्य श्वान प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे केवळ ITBP साठीच नव्हे तर विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि राज्य पोलिस दलांसाठीही उच्च दर्जाचे प्रशिक्षित श्वान तयार केले जातात.
या केंद्रात गुन्हे शोधक, अंमली पदार्थ शोधक, बॉम्ब शोधक, दंगल नियंत्रण, वन्यजीव तस्करी प्रतिबंध तसेच विशेष अॅसॉल्ट ऑपरेशन्ससाठी श्वानांना प्रशिक्षित केले जाते. वाघ-बिबट्याची कातडी, हत्तीचे सुळे, चंदनासारख्या प्रतिबंधित वस्तू शोधण्यासाठीही येथे विशेष “सुपर स्निफर्स” तयार केले जातात.
जळगाव पोलिसांसाठी अभिमानाचा क्षण
जळगाव जिल्हा पोलिस दलातील धुरंधर या श्वानाची या प्रतिष्ठित प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने पोलिस दलात आनंदाचे वातावरण असून, प्रशिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर तो जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








