प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; २८.८१ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव उपसंपादक | प्रणित काठोके
जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करत तब्बल २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एक चारचाकी मालवाहू वाहनासह मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित पानमसाला हस्तगत करण्यात आला.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने जळगाव शहरातील अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान महामार्गावरील डिझो पेट्रोलपंप परिसरात सापळा रचला.
या कारवाईदरम्यान संशयित मालवाहू वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री, वाहतूक व साठवणुकीस प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पानमसाल्याचा मोठा साठा आढळून आला. यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करण्यात आली.
तपासादरम्यान वाहन चालकाचे नाव जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव) असल्याचे समोर आले. वाहनामध्ये प्रतिबंधित पानमसाल्याच्या ५८ गोण्या आढळून आल्या.
जप्त मुद्देमाल
प्रतिबंधित विमल सुगंधित गुटखा व पानमसाला – ₹२१,८१,६००
महिंद्रा कंपनीचे पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप मालवाहू वाहन (MH 19 CX 3280) – ₹७,००,०००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹२८,८१,६००
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५७१/२०२६ दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.








