एमआयडीसीतील फरसाण उत्पादकावर कारवाई; अस्वच्छता व पुनर्वापरित तेलाचा वापर उघड
जळगाव उप संपादक | प्रणित काठोके
जळगाव : एमआयडीसी परिसरातील एका फरसाण उत्पादक पेढीवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ७ हजार ८० रुपयांची रतलामी शेव जप्त केली आहे.
तपासणीदरम्यान उत्पादन प्रक्रियेत गंभीर अस्वच्छता आढळून आली. तसेच पुन्हा-पुन्हा वापरण्यात आलेल्या खाद्यतेलाचा वापर उत्पादनासाठी होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाने नमूद केले.
कारवाईदरम्यान वापरलेल्या तेलाचे तसेच जाड व बारीक रतलामी शेवचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. उर्वरित १४.९ किलो रतलामी शेवचा साठा जप्त करण्यात आला. प्रयोगशाळा अहवालानंतर संबंधित उत्पादकाविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येणार आहे.








