विधान परिषद निवडणुकीसाठी अशोक काकडे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती
जळगाव उप संपादक | प्रणित काठोके
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी भारत निवडणूक आयोगाने वरिष्ठ आयएएस अधिकारी अशोक काकडे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी ही नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून २२ जून २०२६ रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्ष, उमेदवार तसेच मतदारांना निवडणुकीसंदर्भातील सूचना, तक्रारी अथवा इतर बाबींबाबत निवडणूक निरीक्षक अशोक काकडे यांच्याशी थेट संपर्क साधता येणार आहे.
निवडणूक निरीक्षकांचा मुक्काम जळगाव येथील ‘नालंदा’ अतिथीगृहात असून त्यांच्याशी संपर्कासाठी कार्यालयीन पत्ता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव असा आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते ४ जून, १० ते १२ जून आणि १७ ते २२ जून २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उमेदवार व मतदार निवडणूक निरीक्षकांना भेटू शकतील किंवा निवडणूक विषयक बाबी मांडू शकतील.
विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने ही नियुक्ती केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.








