क्राइम रिपोर्टर अशोक पाचुंदकर
पुणे विषारी दारू प्रकरणाचा तपास वेगात; सहा आरोपी अटकेत, सीआयडीकडून १० पथकांमार्फत चौकशी
पुणे, प्रतिनिधी : पुण्यातील दापोडी व हडपसर परिसरात विषारी हातभट्टीची दारू सेवन केल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग करण्यात आला असून तपासाला वेग आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, दापोडी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एकूण १० विशेष तपास पथके तयार करण्यात आली असून ती विविध अंगांनी चौकशी करत आहेत.
सीआयडीने आतापर्यंत आकाश जाधव (रा. हडपसर), इरफान निसार कुरेशी (रा. पवार वस्ती, दापोडी) आणि ओमप्रकाश संजय धोत्रे (रा. गोखलेनगर) यांच्यासह एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली.
या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच अन्य संबंधित विभागांकडून माहिती मागविण्यात आली आहे. दारूचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून रासायनिक विश्लेषण अहवालाची प्रतीक्षा आहे.
तपासादरम्यान घटनास्थळावरील CCTV फुटेज, साक्षीदारांचे जबाब, जप्त साहित्य व इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने वैज्ञानिक पद्धतीने तपास सुरू असून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचीही छाननी केली जात आहे.
सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या प्रकरणासंदर्भात कोणाकडेही महत्त्वाची माहिती असल्यास त्यांनी तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
तपास अधिकारी : श्यामराव काळे, पोलीस उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
मोबा. ७८७५२१२२२८
सचिन चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
मोबा. ९०११३३४५८०
या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून विषारी दारू पुरवठा साखळीतील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत तपास यंत्रणेकडून देण्यात आले आहेत.
– अशोक पाचुंदकर
क्राईम रिपोर्टर,
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज








