सोलापूरांत प्रसिद्ध रीलस्टार रोहिणी निलेश पाराधे हिची गळफास घेवुन आत्महत्या, मंगळवेढा पोलीस घटनास्थळी दाखल! ( सोलापूर जिल्हा) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यांतील ब्रम्हपुरी येथील रीलस्टार रोहिणी निलेश पारधे (वय 25) या महिलेने ( दि. 26) मे रोजी दुपारच्या सुमारांस स्वतःच्या हॉटेल स्वयंपाक घरांमध्ये गळफास घेवुन आपले जीवन संपवले आहे. मात्र रोहिणी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र या घटनेमुळे परिसरांत मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. रोहिणी आणि निलेश पारधे हे दाम्पत्य मागील काही वर्षापासून सोशल मीडियावर रील स्टारच्या माध्यमांतून लोकप्रिय झाले होते. विविध सामाजिक विषय तसेच खाद्यपदार्थांवर आधारित व्हिडिओ तयार करून आपला मोठा प्रेक्षकवर्ग त्यांनी निर्माण केला होता. “हॉटेल ग्रामपंचायत” हे नाव गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते.
हॉटेलच्या किचनमधून बनवले जाणारे पदार्थ, गावाकडची शैली आणि रोहिणी यांचा साधा पण आत्मविश्वासपूर्ण अंदाज यामुळे हजारो लोक त्यांच्या रील्स पाहत होते.
मेहनतीच्या जोरावर उभा केलेला व्यवसाय, वाढत चाललेली लोकप्रियता आणि नवीन शाखांचे स्वप्न… सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे दिसत असतानाच रोहिणी यांनी हॉटेलच्या स्वयंपाक घरात ओढणीने गळफास घेतल्याची घटना उघड झाली.
मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर पती निलेश यांनी तातडीने त्यांना उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गावातील अनेकांसाठी रोहिणी या केवळ व्यावसायिक नव्हत्या, तर स्वतःच्या मेहनतीवर उभं राहण्याची प्रेरणा होत्या.
किचन सांभाळत, हॉटेल चालवत आणि सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत त्यांनी अनेक महिलांसमोर एक उदाहरण उभं केलं होतं.
आज त्याच रोहिणी अचानक निघून गेल्याने ब्रम्हपुरी गावात शोककळा पसरली आहे.
रील्समध्ये कायम हसताना दिसणारी मुलगी मनात किती वेदना घेवुन वावरत होती, हा प्रश्न आता अनेकांना अस्वस्थ करत आहे. मात्र रोहिणी यांनी मानसिक तणावांतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरही अनेक प्रेक्षकांनी दुःख व्यक्त केले आहे.
या प्रकरणाची नोंद मंगळवेढा पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरी गिड्डे करीत आहेत.








