काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई; ५.२३ लाखांची हातभट्टी दारू जप्त, आरोपी जेरबंद
उपसंपादक :-गणेश महाडिक
पुणे : काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अवैध हातभट्टी दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत २४५० लिटर गावठी हातभट्टी दारूसह एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ मे २०२६ रोजी काळेपडळ पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन ढोले आणि गिरीराज जगदाळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सातवनगर, हांडेवाडी रोड येथील गणपती मंदिरामागील मोकळ्या जागेत एक इसम चारचाकी वाहनांमध्ये गावठी हातभट्टी दारूचा मोठा साठा करून ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाईची तयारी केली.
सदर माहिती तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी दोन पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. यावेळी सुनिल हरि कचरावत (वय ५०, रा. गणपती मंदिराजवळ, सातवनगर, हांडेवाडी रोड, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीच्या आजूबाजूच्या झाडाझुडपांमध्ये तसेच सेंट्रो कार (एमएच १२ डीएस ४०८०) मध्ये ७० प्लास्टिक ड्रममध्ये भरलेली तब्बल २४५० लिटर हातभट्टी दारू आढळून आली. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून त्याची एकूण किंमत ५ लाख २३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ ६ जीवन बेनीवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांनी सहभाग घेतला.








