सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त
उपसंपादक:- गणेश महाडिक
पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
दि. २४ मे २०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांचे पथक सिंहगड रोड परिसरात गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार संदीप कांबळे आणि समीर माळवदकर यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी साया ऊर्फ साई सुधाकर पुजारी हा गावठी पिस्टल घेऊन विश्रांतीनगरकडून हिंगणे लंडन ब्रिजकडे जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅकवरील कमानीजवळ संशयास्पदरीत्या थांबला आहे.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव साया ऊर्फ साई सुधाकर पुजारी (वय १८, रा. दत्तवाडी, सिंहगड रोड, पुणे) असे सांगितले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल आणि २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २०८/२०२६ अन्वये आर्म अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.








