बीडमध्ये जनावरे चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त
प्रतिनिधी संगीता ईनकर बीड
पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागोबा गल्ली परिसरातून स्कॉर्पिओ वाहनातून गोवंश जातीची जनावरे चोरी केल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत आंतरजिल्हा जनावरे चोरी करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ३ लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे.
दि. ६ मे २०२६ रोजी पेठ बीड पोलीस ठाण्यात जनावरे चोरीबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी तात्काळ तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी बीड शहरातील तब्बल ४० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. संशयित काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओचा माग काढताना आरोपी सतत वाहनाच्या नंबर प्लेट बदलून प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाले.
तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे हे वाहन मालेगावच्या दिशेने गेल्याचे समोर आल्यानंतर तपास पथक तात्काळ रवाना झाले. पोलिसांनी शेख इब्रान शेख ईसा याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सिल्लोड येथे सापळा रचून आणखी दोन आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे इब्रान ईसा शेख (वय ३४), शेख तय्यब शेख शफीक (वय ४०) आणि सलमान वहाब सय्यद अशी आहेत. चौकशीत या टोळीने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही जनावरे चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले असून आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटोळे करत असून इतर साथीदार आणि चोरीतील मुद्देमालाचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.








