वाघोलीतील ‘9 सेंसेस स्पा’वर क्राईम ब्रँचचा धाडसी छापा; देहविक्रीचा पर्दाफाश, पाच महिलांची सुटका
उपसंपादक : गणेश महाडिक
दि.२३/०५/२०२६ पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने वाघोली परिसरातील एका स्पा सेंटरवर धडक कारवाई करत देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे वाघोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वाघोली येथील बकोरी फाटा परिसरातील “9 सेंसेस स्पा” या स्पा सेंटरमध्ये महिलांकडून अनैतिक देहविक्री व्यवसाय चालवला जात होता. या माहितीची खात्री करण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली. माहिती सत्य असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला.
या कारवाईदरम्यान स्पा सेंटरमधून पाच महिलांची सुटका करण्यात आली. तसेच या प्रकरणी महावीर सुदाम ससाणे (वय २९, रा. साईनाथनगर, पेऱणे फाटा, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. आणखी एका आरोपीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या संदर्भात वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 341/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत कलम 3, 4 व 5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, उपायुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक छगन कापसे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.








