भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई : विधीसंघर्षित बालकाकडून गावठी कट्टा जप्त
उपसंपादक:-गणेश महाडिक
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत एका विधीसंघर्षित बालकाकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांनी पुन्हा एकदा वचक निर्माण केला आहे.
दिनांक १८ मे २०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वंडर सिटी परिसरातील सर्व्हिस रोडलगत एक संशयित युवक थांबला आहे.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. यावेळी एका विधीसंघर्षित बालकाकडे तपास केला असता त्याच्याकडून अंदाजे ५० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त करून संबंधिताविरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २७४/२०२६ अन्वये भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग आणि तपास पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.








