हरताळा फाटा येथे लाखो रुपयांचे लोखंडी ट्रसल अँगल व चॅनल चोरी
*प्रतिनिधी | प्रणित काठोके* –
मुक्ताईनगर शहरालगत असलेल्या हरताळा फाटा परिसरात लाखो रुपयांच्या लोखंडी अँगल चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरताळा फाट्याजवळील उड्डाणपूल शेजारी बांधकामासाठी साठवून ठेवलेले लोखंडी चॅनल (अँगल) अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेले. सकाळी हा प्रकार लक्षात येताच संबंधितांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. चोरी झालेल्या साहित्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची लेखी तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, शहरात व आजूबाजूच्या परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून चोरट्यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.








