लेखणीच्या हातांनी समाज घडवायला हवा – विनोद अष्टुळ
प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
- शिक्षक, लेखक, पत्रकार, कवी, शाहीर, गायक आणि प्रबोधनकार अशा स्त्री पुरुष सर्व लेखनी धारकांनी आपले लेखन सत्य आणि निर्भीड केले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाचा बोध होऊन समाजाला समृद्ध दिशा मिळेल. ते लेखन सातत्याने लोकसमूहांच्या ठिकाणी सादर केले पाहिजे. आपल्या महापुरुषांनी केलेल्या कार्याचा आदर्श समाजासमोर नित्य मांडला पाहिजे. असे मत कविवर्य विनोदजी अष्टुळ यांनी व्यक्त केले.
सिद्धार्थ वाचनालय आणि ग्रंथालय या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळावा तसेच मराठी भाषा पंधरवडा निमित्त साहित्य सम्राट पुणे यांचे २१६ वे संयुक्त कवी संमेलन सिद्धार्थ ग्रंथालय कॅम्प पुणे येथे आयोजित केले होते. त्यावेळी अष्टुळ बोलत होते.
विचार पिठावर सिद्धार्थ ग्रंथालयाचे सचिव बाळकृष्ण सातपुते, शब्दकवी राहुल भोसले, ग्रंथपाल दिलीप भिकुले आणि साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ उपस्थित होते.
कवी संमेलनामध्ये कवी कवयित्री यांनी विविध विषयांवर प्रबोधनात्मक कविता आणि गजला सादर केल्या.
निवडणुकीच्या काळातील कार्यकर्त्यांच्या जीवनावर भाष्य करणारी कविता सादर करताना रमेश जाधव म्हणतात
निवडणुकीसाठी नेते कार्यकर्त्यांच्या घरात
निकालानंतर कार्यकर्त्यांची वाऱ्यावरची वरात
जीवनाचे महत्त्व सांगताना ज्येष्ठ गजलकार सतीश देवपूरकर म्हणतात
शुल्क जगण्याचे भरावे लागते
कर्ज श्वासांचे फिटावे लागते
राहुल भोसले यांनी समाजाचे वास्तव आपल्या कवितेतून परखडपणे व्यक्त केले आहे
माणसांच्या गर्दीत फिरत राहिलो
फसवे मुखवटे निहाळत राहिलो
विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर परखड लिहिताना कवी राम सर्वगोड म्हणतात –
जग चालते मोबाईलवर
ना जातीवर ना धर्मावर
आज समाजातील माणुसकी जपण्यासाठी कवी नंदकिशोर गावडे कवितेतून प्रयत्न करतात
माणसातल्या माणुसकीचा झालाय अंत
नाही तुम्हा आम्हास कुणाबद्दल खंत
समाजातील चित्र वेगळे असले तरी खरा नेता कसा असतो हे आपल्या गजलेतून श्रीकांत वाघ सांगतात
स्वप्न आशा मार्ग जगण्या दावतो जो तोच नेता
जो भल्यासाठीच जगतो वागतो तोच नेता
ॲड. चंद्रकांत गायकवाड महामाता रमाईच्या जीवनावरील कवितेत म्हणतात –
माझी रमाई सांगून गेली दुबळेपणाला सांडा
शिकून सारे एकजुटीने हक्कासाठी भांडा
शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील विचारावर भाष्य करून स्वराज्य निर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांना प्राचारण करणारी कविता कवी विनोद अष्टुळ यांनी सादर केली.
शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्मास यावे
तलवारीने सरळ आमचे शिर छाटावे
अशा वास्तववादी आणि महामानवांच्या विचारांच्या कविता कवी सिताराम नरके तसेच कवयित्री स्मिता पोळ या सर्व कवी गझलकार यांनी प्रबोधनात्मक कविता सादर करून पुस्तक प्रेमी आणि काव्यरचिकांची उत्स्फूर्तपणे मने जिंकली.
उपस्थित मान्यवर विकास भांबोरे आणि शेख वहिद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमांमध्ये गहिनीनाथ हुमे, गोपाळ पांचाळ, अरुण गुळवे, मंगेश पोळ, डॉ रंगराज हुमे, गोविंद भोंडे, ॲड.भावसार, मोहन नारायणे, चेतन पैलवान, हुसेन तांबोळी, कृष्णा शेंडगे, सचिन कांबळे, जावेद जाफर , पुस्तक प्रेमी, काव्यरसिक ,पदाधिकारी, आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर आभार दिलीप भिकुले यांनी व्यक्त केले.








