मुक्ताईनगर तहसील कार्यालय परिसरात अस्वच्छतेचा विळखा
मुक्ताईनगर | प्रतिनिधी प्रणित काठोके
मुक्ताईनगर तहसील कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात कचरा, प्लास्टिक, सुकलेली पाने, तोडलेल्या झाडांच्या फांद्या तसेच टाकाऊ साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
तहसील कार्यालय हे महत्त्वाचे शासकीय कार्यालय असून दररोज अनेक नागरिक विविध कामांसाठी येथे येत असतात. अशा महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाच्या आवारात अशी परिस्थिती असणे म्हणजेच प्रशासनाच्या दुर्लक्षाचे स्पष्ट उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र परिसरातील अस्वच्छतेमुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. काही ठिकाणी कचरा कुंड्या साफ न असल्याचेही चित्र दिसत आहे.
याशिवाय झाडांच्या तोडलेल्या फांद्या व बांधकामातील टाकाऊ साहित्य रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याने पादचाऱ्यांना व वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्वच्छ भारत अभियान केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांन कडून व्यक्त केली जात आहे.








