डोंबिवलीत काटई बदलापूर रस्त्यावरील कोळेगावात चार दिवसांपूर्वी राहत्या घरी पत्नीचा गळा आवळून खून करण्यात आला
प्रतिनिधी मुकुंद मोरे
डोंबिवली जवळील काटई बदलापूर रस्त्यावरील कोळेगावात चार दिवसांपूर्वी राहत्या घरी पत्नीचा गळा आवळून खून करून पती फरार झाला होता. मानपाडा पोलीस या पतीच्या मागावर होते. पोलिसांच्या तावडीत सापडण्यापूर्वीच तणावात असलेल्या पतीने शुक्रवारी मध्य रेल्वेच्या भांडुप रेल्वे स्थानकात दुपारच्या वेळेत आत्महत्या केली. ज्योती दहिजे हिचा पती पोपट दिलीप दहिजे याने कोळेगावातील राहत्या घरात खून केला होता. पोपट हा बिगारी कामगार होता. एका गृहसंकुलाच्या निवाऱ्यात तो पत्नीसह राहत होता. कोळे गावातील एका रिक्षा चालकाला पोपटने दुसऱ्या दिवशी कामावर येण्याचे आश्वासन दिले होते. दुसऱ्या दिवशी दुपार झाली तरी पोपट कामावर आला नाही म्हणून रिक्षा चालक आणि त्याचे सहकारी पोपटला मोबाईलवर संपर्क करत होते.
त्याचा मोबाईल बंद येत होता. रिक्षा चालक आणि सहकारी पोपटच्या कोळेगावातील घरी आले. घराला बाहेरून कुलूप होते. पोपटच्या घराबाहेरून पोपटच्या पत्नीला पोपट कोठे आहे हे विचारण्यासाठी मोबाईलवर संपर्क केला. तेव्हा पोपटच्या घरात मोबाईलची रिंग वाजत असल्याचे दोघांच्या लक्षात आले. घर बंद आहे आणि मोबाईल मात्र घरात वाजतो म्हणून रिक्षा चालकाने पोपटच्या घरात खिडकीतून वाकून पाहिले तर त्यांना धक्काच बसला. पोपटची पत्नी घरात मृत अवस्थेत पडली होती. तिचा गळा आवळून पोपटने तिचा खून केला होता. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. ही माहिती तातडीने मानपाडा पोलिसांना देण्यात आली होती. पोलीस पोपटचा शोध घेत होते. त्याच्या मोबाईलचे ठिकाण शोधत होते.
मानपाडा पोलीस पोपटचा शोध घेत असताना भांडुप रेल्वे स्थानकात दुपारच्या वेळेत एका प्रवाशाने लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली होती. ही माहिती त्यांना मिळाली आणि ओळख पटल्यानंतर तो पोपट दिलीप दहिजे असल्याचे स्पष्ट झाले.








