प्रतिनिधी : गोपाळ भालेराव
चाकण (जि. पुणे) – महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणाचा तपास अधिक गडद होत चालला आहे. शशांक हगवणे व लता हगवणे यांच्या विरोधातील या प्रकरणात आणखी एक अटक करण्यात आली असून, शशांकचा मित्र प्रणय साठे याच्याही गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रणय तुकाराम साठे (वय २७, रा. कोथरूड, पुणे) याला शुक्रवारी (दि. ६) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तोतया बँक वसुली एजंटांकडून जेसीबीचा ताबा मिळवून देण्यासाठी प्रणयने मध्यस्थी केली होती. शशांक हगवणेने चालक देवानंद कोळी याच्या मार्फत गुगल पेद्वारे ३० हजार रुपये प्रणय साठे याला दिले होते, आणि ही रक्कम पुढे अटक आरोपी गणेश पोतले याला देण्यात आली होती.
पोलिसांनी सांगितले की, जेसीबीचा व्यवहार भाडेकराराचा असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, नोटरीद्वारे तयार केलेल्या करारनाम्यावरून हा खरेदी व्यवहारच असल्याचे सिद्ध झाले. त्यात नमूद अटी व शर्ती, तसेच टीटी फॉर्मवर सह्या नसल्याची बाब तपासात स्पष्ट झाली आहे.
सरकारी वकीलांचा युक्तिवाद :
हगवणे व साठे यांच्याकडून नोटरी करारनाम्याची प्रत हस्तगत करणे आवश्यक असून, यासाठी दोघांची पुन्हा पोलिस कोठडी आवश्यक आहे. त्यांनी मांडवलीसाठी आर्थिक देवाणघेवाण केली असून, व्यवहाराची पारदर्शकता संशयास्पद आहे.
आरोपी पक्षाचा युक्तिवाद :
या प्रकरणात आरोपींविरुद्ध अन्य कोणतीही एनसी दाखल नाही. जेसीबीवर बँकेचे कर्ज असल्याने ट्रान्स्फर शक्यच नाही. शिवाय, फिर्यादीने दिलेल्या ११.७० लाखांपेक्षा जास्त भाडे हगवणे यांनी भरले असून, हा खटला फसवणुकीचा नसून, भाडे न भरल्याने करण्यात आलेला बनाव असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
या प्रकरणात हगवणे माय-लेक, प्रणय साठे व तीन बोगस एजंट अशा सहा आरोपींच्या संयुक्त सुनावणीसाठी उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आजच्या सुनावणीत राजगुरूनगर न्यायालयाने हगवणे माय-लेक व प्रणय साठे यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाट्यमय प्रसंग :
सुनावणीदरम्यान लता हगवणे यांना अचानक भोवळ आल्याने त्यांना खुर्ची देऊन विश्रांतीस बसवण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेत क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.








