जागतिक पर्यावरण दिन: महावितरणचा ‘हरित’ पुढाकार, पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटीबद्ध
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर, दि. 5 जून 2025: आज सर्वत्र ‘जागतिक पर्यावरण दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. ‘आपली जमीन, आपले भविष्य’ या संकल्पनेवर आधारित यंदाचा पर्यावरण दिन पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राची ऊर्जावाहिनी असलेल्या महावितरणने पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतले असून, ‘हरित ऊर्जा, हरित महाराष्ट्र’ या ध्येयाकडे वाटचाल करत आहे.
जागतिक तापमानवाढ, प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास यांसारख्या गंभीर समस्यांनी आज जगाला विळखा घातला आहे. अशा स्थितीत, ऊर्जा क्षेत्राची पर्यावरणाप्रती असलेली जबाबदारी अधिक वाढते. महावितरणने ही जबाबदारी ओळखून, केवळ वीजपुरवठा करण्यापलीकडे जाऊन, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सक्रिय भूमिका घेतली आहे.
महावितरणचे पर्यावरणपूरक उपक्रम:
सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन: महावितरणने घरांवर आणि व्यावसायिक आस्थापनांवर सौर ऊर्जा प्रकल्प (रुफटॉप सोलर) बसवण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन दिले आहे. नेट-मीटरिंग धोरणामुळे ग्राहक स्वतः वीज निर्माण करून तिचा वापर करू शकतात आणि अतिरिक्त वीज महावितरणला विकू शकतात. यामुळे कोळशावर आधारित वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जन घटण्यास मदत होते. याशिवाय शेतक-यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषीपंप योजना सर्वत्र राबवित आहे.
हरित ऊर्जा खरेदी करार: महावितरणने पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा प्रकल्पांकडून मोठ्या प्रमाणावर हरित ऊर्जा खरेदी करण्याचे करार केले आहेत. यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील ताण कमी होत आहे.
गो-ग्रीन: महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात 10 रुपये सूट देण्यात येत होती आता गो-ग्रीनचा पर्याय स्विकारताच पहिल्या बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ 120 रूपये एकरकमी सवलत सिली जात आहे.
वीज बचत मोहिमा: महावितरण वेळोवेळी जनजागृतीपर मोहिमा राबवून ग्राहकांना वीज बचतीचे आवाहन करते. एलईडी दिव्यांचा वापर, योग्य उपकरणांची निवड आणि अनावश्यक वीज वापर टाळण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. वीज बचत म्हणजे ऊर्जा बचत आणि ऊर्जा बचत म्हणजे पर्यावरणाची बचत!
ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स: प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणने राज्यभरात ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास आणि स्वच्छ वाहतूक प्रणालीला चालना मिळण्यास मदत होईल.
वनस्पती लागवड आणि जैवविविधता संवर्धन: महावितरणच्या अनेक कार्यालये आणि उपकेंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. यामुळे परिसरातील हवा शुद्ध होते आणि जैवविविधता जपली जाते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, महावितरणने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले आहे. वीज बचत करणे, सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, अनावश्यक कचरा टाकणे टाळणे आणि जास्तीत जास्त झाडे लावणे हे आपले नैतिक कर्तव्य असून ते सर्वांनी पार पाडण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरण केवळ वीज वितरण करणारी कंपनी नसून, पर्यावरणाचे रक्षण करणारी एक जबाबदार संस्था आहे. त्यांच्या या ‘हरित’ पुढाकारामुळे ‘हरित महाराष्ट्र’ आणि पर्यायाने ‘हरित भारत’ हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर









