उडान मुळे नागपूर जिल्ह्यात मानसिक आरोग्य सेवांचे सशक्तीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २५ मे : महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्ट्सच्या सहकार्याने सुरू केलेल्या ‘उडान’ या जिल्हास्तरीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाने नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळवले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मानसिक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मानसिक आरोग्याची जनजागृती वाढविणे, ग्रामीण व शहरी भागात सहज सेवा उपलब्ध करणे, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशकांची संख्या वाढवणे, रूग्णालयाबाहेर उपचार देणे, विशेष मानसिक सेवा उपलब्ध करणे ही राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरणाची उद्दिष्टये आहे. उडाण हा कार्यक्रम याच मानसिक आरोग्य धोरणाशी सुसंगत असून हा महाराष्ट्र शासनाचा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रावर मानसिक आरोग्य सेवा देण्यात येत आहे.
सन २०१८ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘उडान’ उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत दर्जेदार मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेची अंमलबजावणी सन २०१८ साली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट्स यांच्या भागीदारीतून करण्यात आली होती. सन २०२३ पासून या योजनेची जबाबदारी ग्रामीण आदिवासी विकास सेवा संस्था या संस्थेकडे सुपूर्त करण्यात आली असून, इंदिरा फाउंडेशन या कार्यक्रमास सहकार्य करत आहे.
या उपक्रमांतर्गत, जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील २ उपजिल्हा रुग्णालये, १० ग्रामीण रुग्णालये, ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ७७८ ग्रामपंचायती व १७२४ आशा कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने गावागावांमध्ये टॅबच्या माध्यमातून घरोघरी मानसिक आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले असून, आजपर्यंत ६,२२,४३१ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पातून ९११० मानसिक आरोग्य बाह्य रुग्ण विभागाचे सत्र आयोजन केले असून, ९४७२ रुग्णांना उपचार आणि एकूण ९२,४२३ सल्ला व उपचार सेवा पुरविण्यात आल्या आहेत. या रुग्णांपैकी ६६% रुग्ण पूर्णत बरे झाले असून, २४% रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नागपूर जिल्ह्यातील ६९ सेवा केंद्रांपैकी १३ केंद्रांवर जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम पथक व ५६ केंद्रांवर प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी मार्फत सेवा पुरविल्या जात आहेत. जिल्ह्यातील ४६५ गावांमध्ये, ग्रामपंचायती, भजन मंडळ, शेतकरी गट व महिला बचत गटांच्या सहकार्याने मासिक जनजागृती कार्यक्रम राबवले जातात. याशिवाय, उडान चमू कडून ११,९३६ रुग्णांच्या घरी जाऊन समुपदेशन सत्रे घेतली गेली आहेत. १७२४ आशा कार्यकर्त्यांना मानसिक आरोग्य व जनजागृती या विषयावर विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पूर्वी गावातील नागरिकांना मानसिक आरोग्य सेवेसाठी नागपूर शहरात यावे लागत होते, परंतु आता त्यांना जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रांवरच या सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
नागरिकांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी उडान उपक्रमासोबत जिल्हा प्रशासनासह जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या सदस्यांची मोठी मदत होते. त्याचबरोबर, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, ग्रामीण रुग्णालये (RH), उपजिल्हा रुग्णालये (SDH) आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) यांचेही मोठे योगदान आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, उडान उपक्रमामुळे नागपूर जिल्ह्याने मानसिक आरोग्य क्षेत्रात मोठी उडी घेतली असून, हा उपक्रम देशातील इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श ठरणारा आहे.
