अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
नागपूर, दि. 28 एप्रिल 2025: विद्युत पुरवठा अविरत ठेवणारे महावितरण आता कला क्षेत्रातही आपली प्रतिभा सादर करण्यासाठी सज्ज झाले आहे. महावितरणच्या नागपूर प्रादेशिक स्तरावरील आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा ‘नाट्यकुंभ-2025’ चे आयोजन चंद्रपूर परिमंडलाच्या यजमानपदाखाली येत्या 2 आणि 3 मे 2025 रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. या दोन दिवसीय नाट्य महोत्सवात महावितरणच्या चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि अकोला परिमंडलांचे नाट्यसंघ आपले कला कौशल्य सादर करणार आहेत.
दैनंदिन जीवनात प्रकाशाची ऊर्जा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दरवर्षी या नाट्यस्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या स्पर्धेचे उद्घाटन महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 2 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. तर, शनिवार, दि. 3 मे 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल. या दोन्ही कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत असतील. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी, संचालक (वित्त) अनुदिप दिघे आणि संचालक (मानव संसाधन) राजेण्द्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच, संचालक (वन प्रबोधिनी) चंद्रपूर, एम. श्रीनिवास रेड्डी, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या दोन दिवसीय नाट्य स्पर्धेत शुक्रवार, दि. 2 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता चंद्रपूर परिमंडल श्रीपाद जोशी लिखित ‘रंगबावरी’ हे नाटक सादर करेल. सायंकाळी 4.30 वाजता नागपूर परिमंडलाचा प्रदीप फाटक लिखित ‘ये रे घना’ चा नाट्यप्रयोग रंगणार आहे. शनिवार, दि. 3 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता गोंदिया परिमंडल अतुल साळवे यांच्या ‘दि ॲनॉनीमस’ या नाटकाद्वारे आपली कला सादर करेल, तर दुपारी 3 वाजता अकोला परिमंडल डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित ‘सिकॅरिअस’ हे नाटक घेऊन येत आहे.
अभिनय, संवाद, संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य आणि दिग्दर्शन यांसारख्या नाट्य घटकांसाठी ही प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा अत्यंत चुरशीची ठरणार आहे. विदर्भातील रसिकांसाठी ही स्पर्धा एक उत्कृष्ट नाट्य मेजवानी असेल यात शंका नाही. नाट्यस्पर्धेचे स्वागताध्यक्ष आणि महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी नाट्यप्रेमी रसिकांना या निःशुल्क आणि दर्जेदार नाट्यकृतींचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
