परभणीत दुसऱ्यांदा ग्रीन कॉरिडोर ; युवकाचे अवयव दान
प्रतिनिधी गोपाळ भालेराव
परभणी, ता. २३ : जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे गावातील २५ वर्षीय युवक दीपक विलासराव दराडे याचे पाच अवयव दान करण्यात आले. यासाठी रविवारी (ता. २३) रात्री परभणी शहरातील देवगिरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला.
या बाबत माहिती अशी कि,
दराडे हा युवक शुक्रवारी मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यास कुटुंबातील सदस्यांनी परभणीतील देवगिरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतू तेथील डॉक्टरांनी त्या युवकांस ब्रेन डेड घोषित केले. त्यातून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला, परंतु त्यातून सावरत कुटुंबियांनी अवयव दानाचा निर्णय घेतला,पाठोपाठ डॉ. एकनाथ गबाळे यांनी सहकारी डॉक्टरांची टीम तयार करून अवयव दानाची प्रक्रिया पूर्ण केली.
नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण केल्यानंतर आज रविवारी सायंकाळी ६ वाजता अवयव दाना संदर्भात प्रक्रिया सुरू केली. दराडे याचे हृदय मुंबईला पाठवण्यासाठी परभणी ते नांदेडदरम्यान ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. नांदेडहून चार्टर प्लेनद्वारे हृदय मुंबईला पाठवण्यात आले. फुफ्फुसे (लँग्स) दुसऱ्या चार्टर प्लेनने पुण्याला, तर यकृत (लिव्हर) नागपूरला पाठविण्यात आले. दीपकच्या दोन्ही किडन्या छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आल्या. या महत्त्वपूर्ण अवयवदान प्रक्रियेमुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. दीपकच्या कुटुंबीयांच्या या निर्णयाचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.
परभणीत दुसऱ्यांदा ग्रिन कॅरिडॉर
या पूर्वी ऑक्टोबर २०२४ मधे जिंतूर शहरातील सार्थक नवले या युवकाचे अवयव दान करण्यात आले होते. त्यानंतर हे दुसरे अववय दान झाले आहे.
