अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सतीश कडू
सूमारे 300 विजेत्यांना बक्षिस
जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा समारोप
नागपूर, दि.31 : महसूल विभाग शासनाचा कणा असून जिल्ह्यातील कामाचा व्याप प्रामुख्याने अधिकारी व कर्मचाऱ्यावर येत असतो. दैनंदिन ताणातून मुक्त होणासाठी, सुदृढआरोग्यासाठी दररोज एक तास व्यायामासाठी द्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
तीन दिवसीय जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन मानकापूर विभागीय संकुल प्रांगणात करण्यात आले होते. या स्पर्धांच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, महानगर पालिकेच्या उपायुक्त विजया बनकर, गेल इंडिया लिमिटेडच्या उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांच्यासह उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय विजेत्या स्पर्धकांनी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन नागपूर जिल्हास प्रथम क्रमांक मिळवून द्यावा. मागील राज्यस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत जिल्ह्याने दुसरा क्रमांक प्राप्त केला होता.यावर्षी जोमाने कामगिरी करुन पहिला क्रमांक मिळवा, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी खेळाडूंना दिल्या. खेळाडुवृत्तीने पुढील स्पर्धा जिंका, आयुष्यात शरीर सदृढ ठेवा, व्यसनापासून दूर रहा, असा सल्ला त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला.
प्रास्ताविकात अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले. खेळाडू कार्यक्षमतेचे प्रदर्शन घडवून विजेते झाले आहेत. हा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम ठेवून चंद्रपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत सहभागी व्हा, टिम स्पिरीट कायम ठेवा. विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी जिद्दीने खेळा, असा सल्ला खेडाळूंना देऊन त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुरेश बगळे यांनी स्पर्धेकांचा उत्साह वाढविण्यासाठी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण
या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत विजयी झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतिय पदक प्राप्त केलेल्या स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. यात बुध्दीबळ,कॅरम,बॅटमिंटन, टेनिस, 100, 200 मिटर धावणे, ऊंच व लांब ऊडी, गोळाफेक थाळीफेक,भालाफेक, जलतरण यासह अन्य स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश होता. तलाठी संघटना, कोतवाल संघटना तसेच इतर संघटनाचे पदाधिकारी, तालुक्याचे संघ तसेच तहसीलदार व महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
