नागपूर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य-संपादक : संतोष लांडे/ किरण सोनवणे.
मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आवश्यक सोईसुविधांसह मुला-मुलींच्या राहण्याची होणार सोय.
नागपूर, दि. 8 – इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील 44 शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण दि. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता ग्रँड एअरपोर्ट बँक्वेट, साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दीक्षाभूमीजवळील समाज कल्याण भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. खिल्लारी बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहसंचालक प्रशांत शिर्के, प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर, सहाय्यक संचालक सुकेशिनी तेलगोटे आदी उपस्थित होते.
राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील पदवी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत 36 जिल्ह्याच्या ठिकाणी एकूण 72 इतर मागास बहुजन कल्याण मुला-मुलींची शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी 10 वसतिगृहांचे लोकार्पण यापूर्वीच करण्यात आले आहे. तर 44 वसतिगृहांचे लोकार्पण 9 आक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. या वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन व शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे.
वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वंकष सुरक्षेची खबरदारी घेण्यात येणार आहे. यात सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक नियुक्तीचा प्राधान्याने समावेश असणार आहे. सुरक्षित वातावरणात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. खिल्लारी यावेळी म्हणाले.
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थी, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यात स्वयंम, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, 75 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या योजनांचा प्रामुख्याने समावेश असल्याची माहिती श्री. खिल्लारी यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील 2 वसतिगृहांचे लोकार्पण.
एकूण 44 वसतिगृहांमध्ये नागपूर जिल्ह्यातील 2 वसतिगृहांचा समावेश आहे. नागपूर विभागातील 6, अमरावती 10, छत्रपती संभाजीनगर 4, लातूर 8, नाशिक 5, पुणे 9, मुंबई 2 अशा एकूण 44 वसतिगृहांचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
