छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समर्पकपणे समाविष्ट करा; शिवशाही प्रतिष्ठानची मागणी
छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, विद्वत्ता, प्रशासन, साहित्यनिर्मिती, बलिदान आणि स्वराज्यरक्षणातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती, पुणे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

इयत्ता ५ वी किंवा त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर स्वतंत्र पाठ्यपुस्तक प्रकाशित करावे, तसेच ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे त्यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समर्पक समावेश करावा, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. विद्यार्थ्यांना विषय सहज समजण्यासाठी चित्रे, कालरेषा (Timeline) आणि पूरक माहितीचा समावेश करावा, अशीही मागणी करण्यात आली.
याच विषयाच्या अनुषंगाने शिवव्याख्याते व इतिहास अभ्यासक मा. नितीन बानगुडे पाटील यांचीही शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित स्वतंत्र शालेय पाठ्यपुस्तकाची आवश्यकता तसेच त्यांच्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समर्पक समावेश करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्राच्या इतिहासाची विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण व सर्वांगीण ओळख व्हावी, या उद्देशाने शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यने ही शैक्षणिक मागणी पुढे केली असून, संबंधित विभागाने याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या वेळेस बोलताना शिवशाही प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राज जाधव व प्रदेश कार्याध्यक्ष अथर्व तावरे म्हणाले –
अथर्व तावरे : “छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण पद्धतीने समजणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या शौर्य, विद्वत्ता आणि स्वराज्यरक्षणातील योगदानाचा समर्पक समावेश शालेय अभ्यासक्रमात व्हावा, अशी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यची मागणी आहे.”
राज जाधव : “छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनकार्य पुढील पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचले पाहिजे. त्यांच्या शौर्याबरोबरच विद्वत्ता, साहित्यनिर्मिती व स्वराज्यरक्षणातील योगदानाचा अभ्यासक्रमात समर्पक समावेश व्हावा, यासाठी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सातत्याने पाठपुरावा करेल.”







