लोणावळा ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची पत्रकार परिषद
लोणावळा किल्ल्यावरील खून प्रकरणाचा उलगडा, आरोपी जेरबंद
पुणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
लोणावळा : लोणावळा किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून छडा लावला आहे. प्रेमसंबंधातून अडथळा ठरत असल्याने कट रचून तरुणाचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिनांक १८ जून २०२६ रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील लोणावळा किल्ल्याच्या पश्चिम बाजूस झुडपामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
सुरुवातीला सदर तरुणाचा मृत्यू किल्ल्यावरून पाय घसरून खाली पडल्यामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती व तपासातील काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.
तपासादरम्यान मयत तरुणाच्या होणाऱ्या पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रेमसंबंधामध्ये अडथळा ठरत असल्याने दोघांनी संगनमत करून कट रचल्याचे तपासात उघड झाले.
दोघांनी मयत तरुणाला लोणावळा किल्ल्यावर फिरण्यासाठी नेले. तेथे नियोजनबद्ध पद्धतीने त्याला किल्ल्यावरून खाली ढकलून त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक मा. शुभम कुमार, लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. गजानन टोपे, तसेच पोलीस उपअधीक्षक (गृह) मा. राजेंद्र मायणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, तसेच पोलीस अंमलदार व तपासी पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.








