पोलीस कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांनाही केले मार्गदर्शन
उपसंपादक | प्रणित काठोके
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी श्रीमती सानिका धिवरे तसेच मातोश्री श्रीमती उषा धिवरे यांनी आज जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस शिपाई निवासस्थानांना सदिच्छा भेट देत पोलीस कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीय व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या भेटीचा मुख्य उद्देश पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा व गरजा जाणून घेणे तसेच त्यांचे मनोबल वाढविणे हा होता.
भेटीदरम्यान त्यांनी विविध निवासस्थानांना भेट देऊन पोलीस शिपाई व त्यांच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली. पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या अडचणी, मुलांच्या शिक्षणासंदर्भातील प्रश्न, आरोग्यविषयक बाबी, निवासस्थानांशी संबंधित सुविधा तसेच दैनंदिन जीवनातील विविध समस्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली. कुटुंबीयांनी मांडलेल्या सूचना व समस्यांची दखल घेत संबंधित बाबींकडे लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांचे जीवन अत्यंत जबाबदारीचे व आव्हानात्मक असल्याचे नमूद करत त्यांच्या कुटुंबीयांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचारी दिवस-रात्र कर्तव्य बजावत असताना कुटुंबीयांचा पाठिंबा त्यांच्या कार्यक्षमतेसाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
भेटीदरम्यान शिपाई निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांशीही विशेष संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, स्पर्धा परीक्षा, करिअरच्या संधी, अभ्यासातील आव्हाने व भविष्यातील उद्दिष्टांबाबत चर्चा करण्यात आली. नियमित अभ्यास, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित करण्यात आले. तसेच यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि सातत्य आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हेल्मेटचा सक्तीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच व्यसनमुक्त जीवनशैली आणि संतुलित आहाराचे महत्त्व याविषयीही उपस्थितांशी चर्चा करण्यात आली.
लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी मिठाई व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. मुलांनी आणि कुटुंबीयांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. अनौपचारिक वातावरणात झालेल्या या संवादामुळे पोलीस कुटुंबीयांना आपल्या समस्या व भावना मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली.
या उपक्रमामुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होत असून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व मानसिक सक्षमीकरणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.








