दहीहंडा परिसरात जनावरे हरवण्याच्या तक्रारी; पोलीस तपासात अनेक जनावरे सापडली, चोरीचा संशय कमी
अकोट (प्रतिनिधी) निलकंठ वसु पाटील
– दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दिनोडा, आलेवाडी व कुटासा या गावांमध्ये गेल्या काही दिवसांत जनावरे हरविल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. सुरुवातीला शेतकऱ्यांमध्ये जनावरे चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र दहीहंडा पोलिसांनी केलेल्या तपासात वेगळीच वस्तुस्थिती समोर आली आहे.
दहीहंडा परिसर हा खारपान पट्ट्यात मोडणारा असून फेब्रुवारी अखेरीस येथील बहुतांश शेती मोकळी होते. हा भाग कोरडवाहू असल्याने उन्हाळी पिके घेतली जात नाहीत. त्यामुळे शेतकरी आपली जनावरे मोकळ्या चराईसाठी सोडतात. अशा परिस्थितीत चारा व पाण्याच्या शोधात ही जनावरे १० ते १५ किलोमीटरपर्यंत दूर भटकत जातात.
पोलीसांनी केलेल्या शोध मोहिमेत अनेक जनावरे सापडली आहेत. आलेवाडी येथील तक्रारदार नारायण श्रीकृष्ण काळमेघ यांची गाय रेल्वे स्टेशन पाटसूल परिसरात सापडली आहे. तसेच दिनोडा येथील सुमारे ८ जनावरे गावापासून काही अंतरावर आढळून आली आहेत. ही जनावरे सापडल्यानंतर संबंधित तक्रारदारांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपापल्या तक्रारी मागे घेतल्या आहेत.
या सर्व घडामोडींमुळे या प्रकरणात चोरीचा संशय मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, काही तक्रारी अद्याप प्रलंबित असून त्या संदर्भात पोलीस कर्मचारी शोधकार्य सुरू ठेवत आहेत. बेवारस अवस्थेत जनावरे आढळल्यास चोरीची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, जनावरे चराईसाठी सोडताना योग्य ती काळजी घ्यावी, त्यांच्यावर लक्ष ठेवावे व शक्यतो ओळख पटेल अशी खूण करावी, जेणेकरून अशा घटना टाळता येतील.








