लोकशाहीच्या उत्सवासाठी लातूर पोलीस सज्ज – महानगरपालिका निवडणूक 2026 साठी बंदोबस्त, सुरक्षित व निर्भय मतदानाची हमी.
प्रतिनिधी रणजीत मस्के
लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या निवडणुका या केवळ मतदानापुरत्या मर्यादित नसून त्या जनतेच्या विश्वासाचे, स्वातंत्र्याचे, पारदर्शकतेचे आणि न्याय्यतेचे प्रतीक असतात. प्रत्येक नागरिकाने कोणत्याही भीतीशिवाय, दबावाशिवाय शांत आणि भयमुक्त वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावावा, हीच खरी लोकशाहीची ओळख आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी लातूर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर लातूर पोलीस प्रशासनाने अत्यंत काटेकोर, शिस्तबद्ध व व्यापक बंदोबस्ताची रचना केली असून संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाली आहे.
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, शांतता व सामाजिक सलोखा प्रस्थापित करणे, समाजकंटक, गुन्हेगारी प्रवृत्ती, अफवा पसरवणारे घटक व गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर नियंत्रण ठेवणे तसेच प्रत्येक मतदाराच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या बंदोबस्ताचा मुख्य उद्देश आहे. यासाठी लातूर शहर व महानगरपालिका हद्दीत सातत्याने रूट मार्च, विशेष गस्त, नाकाबंदी, प्रतिबंधात्मक कारवाया, संशयित घटकांवर लक्ष ठेवणे व गुप्तचर यंत्रणेमार्फत माहिती संकलनाची प्रभावी यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. पूर्वी ज्या भागात तणावजन्य घटना घडल्या आहेत किंवा जिथे निवडणूक स्पर्धा अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे, त्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
संपूर्ण लातूर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 18 प्रभाग असून 142 इमारतींमध्ये 375 मतदान केंद्रे आहेत. सर्व मतदान केंद्रांचे संवेदनशीलतेनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. सामान्य, संवेदनशील व अतिसंवेदनशील अशा वर्गवारीनुसार बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून, ज्या ठिकाणी धोका अधिक आहे त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, SRPF तुकड्या, विशेष गस्त पथके व जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांसोबतच स्ट्राँगरूम, मतमोजणी केंद्र, प्रमुख चौक, मुख्य मार्ग, बाजारपेठा व गर्दीची ठिकाणे या सर्व ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
महानगरपालिका निवडणूक बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. यामध्ये –
– 06 पोलीस उपअधीक्षक
• 79 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे पोलीस अधिकारी,
• 713 पोलीस अंमलदार,
• 450 होमगार्ड जवान,
• SRPF चे 02 सेक्शन (03 अधिकारी व 62 जवान),
• महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र महिला पोलीस पथक,
अशा व्यापक दलाचा समावेश असून, संपूर्ण यंत्रणा 24 तास कार्यरत ठेवण्यात आली आहे.
लातूर महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने लातूर शहरातील पोलीस स्टेशन गांधी चौक शिवाजीनगर एमआयडीसी व विवेकानंद या पोलीस स्टेशन करिता प्रत्येकी एक उपविभागीय पोलीस अधिकारी नियुक्त केले आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी स्वतः प्रत्यक्ष फील्डवर उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवणार असून, निवडणूक काळात विशेष गस्त पथके दिवसरात्र कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र व संवेदनशील परिसरात पोलीस उपस्थिती ठळकपणे जाणवेल, याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास, सुरक्षितता व निर्भयतेची भावना अधिक दृढ होणार आहे.
सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे अफवा, गैरसमज, तणाव व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या माहितीचे प्रभावी माध्यम ठरू शकते. याची गंभीर दखल घेत लातूर पोलीस प्रशासनाने सायबर शाखेला पूर्णतः सतर्क ठेवले आहे. खोटी माहिती, फेक न्यूज, एडिटेड व्हिडिओ, धार्मिक किंवा जातीय भावना भडकवणारे संदेश, आक्षेपार्ह पोस्ट, बॅनर किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यासाठी सायबर शाखा, विशेष देखरेख पथके व नियंत्रण कक्ष 24×7 कार्यरत ठेवण्यात आले आहेत.
नागरिकांना लातूर पोलीस प्रशासनाचे कळकळीचे आवाहन आहे की –
• कोणतीही संशयास्पद पोस्ट, व्हिडिओ किंवा मेसेज आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावा.
• आचारसंहितेचा भंग करणारी, तणाव वाढविणारी किंवा अफवांवर आधारित सामग्री शेअर करू नये.
• फेक न्यूज, खोट्या बातम्या, कटिंग्स किंवा एडिटेड व्हिडिओवर विश्वास ठेवू नये.
• निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार, दबाव, धमकी, पैशाचा किंवा शक्तीचा गैरवापर अथवा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची जाणीव ठेवावी.
आचारसंहिता भंगाच्या अनुषंगाने लातूर पोलीस प्रशासनाने आतापर्यंत प्रभावी कारवाई केली आहे. आचारसंहिता भंग अनुषंगाने
पोलीस ठाणे एमआयडीसी येथे 01, पोलीस ठाणे विवेकानंद येथे 01, पोलीस ठाणे गांधी चौक येथे 01 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच निवडणूक संदर्भात पोलीस ठाणे एमआयडीसी येथे 01 व गांधी चौक येथे 03 अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्यानुसार कारवाई करून 06 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दारूबंदी नियमांअंतर्गत 40 गुन्हे दाखल करून संबंधित आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच बीएनएसएस 2023 च्या कलम 126, 127, 129 सह कलम 170 अन्वये 574 व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. ही आकडेवारी लातूर पोलीस प्रशासनाच्या सज्जतेचे व कठोर भूमिकेचे द्योतक आहे.
एकंदरीत, लातूर महानगरपालिका निवडणूक 2026 शांततेत, निर्भय वातावरणात, निष्पक्षपणे व सुरळीत पार पडावी, यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण लातूर पोलीस दल पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, मतदान व मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षिततेत पार पाडण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे.
ही संपूर्ण तयारी म्हणजे केवळ बंदोबस्त नसून, लोकशाही मूल्यांचे संरक्षण, नागरिकांच्या अधिकारांचा सन्मान आणि समाजात शांतता, सलोखा व विश्वास टिकवून ठेवण्याचा लातूर पोलिसांचा दृढ संकल्प आहे. प्रत्येक नागरिकाने निर्भयपणे मतदान करावे, शांतता राखावी व लोकशाहीच्या या महोत्सवात जबाबदार सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.









