जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सुरक्षेचे धडे.
पुणे दि १२ : “पुणे मॉडेल स्कूल” या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एकूण 35 विद्यार्थ्यां व 5 शिक्षकांनी राष्ट्रीय सुरक्षा अकादमी (NDA), पुणे येथे अभ्यासपर भेट दिली.
विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीय सुरक्षेची प्रेरणा जागृत करणे, तसेच त्यांच्यामध्ये शिस्त, देशभक्ती आणि राष्ट्रसेवेची मूल्ये रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी एनडीए परिसराची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून अकादमीतील जीवनशैली तसेच भारतीय संरक्षण दलांबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती घेतली.
भेटीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांनी अकादमीतील सुदान ब्लॉक, कॅडेट मेस आणि वॉर मेमोरियल यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. तसेच राष्ट्रीय संरक्षण अकादमीवरील माहितीपटही जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला, ज्यामध्ये तिचा इतिहास, प्रशिक्षण तत्त्वज्ञान आणि भारताच्या राष्ट्रीय संरक्षणातील महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांना बंदुका, रणगाडे, क्षेपणास्त्रे आणि इतर संरक्षण व युद्धसामग्री प्रत्यक्ष पाहण्याची व त्याबाबत माहिती घेण्याची संधी मिळाली. भारताच्या संरक्षण सज्जतेची विद्यार्थ्यांना अधिक सखोल समज मिळाली.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी ही भारतातील एकमेव संयुक्त संरक्षण अकादमी असून ती देशातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक आहे. अशा अभ्यासभेटींमधून विद्यार्थ्यांना संरक्षण दलांमधील विविध संधींची ओळख करून देणे आणि त्यांच्या कल्पनाविश्व विस्तारणे हा आमचा उद्देश आहे अशी भावना पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी व्यक्त केली.!








