विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
पुणे दि १२ : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींवर जिल्हास्तरावर गतीने आणि योग्य पद्धतीने कार्यवाही होईल यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.
यावेळी अपर आयुक्त तुषार ठोंबरे, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे तसेच विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी पुणे जिल्ह्यातील २ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एका प्रकरणात अर्जदारांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन डॉ. पुलकुंडवार यांनी सुनावणी घेतली.!








