पक्ष्यांमुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होत असते- माधव गव्हाणे.
शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : – पक्षी हे पर्यावरणातील अत्यंत महत्वाचे घटक असून पक्ष्यांमुळेच पर्यावरणाचे चांगले संवर्धन झालेले आहे असे प्रतिपादन पक्षीमित्र माधव गव्हाणे यांनी केले. चतुरंग प्रतिष्ठान परभणी यांच्या वतीने आयोजित स्व. यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत ते बोलत होते. मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. माणिकराव घाटूळ तर प्रमुख अतिथी म्हणून वन्यजीव छायाचित्रकार विजय ढाकणे, उपमुख्याध्यापक श्री राजू लांडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, पर्यावरणाची निगा राखण्यासाठी पक्षी सदैव तत्पर असतात. काही पक्षी पिकांवरील आणि वनस्पतीवरील कीड नष्ट करण्यात मोलाची भूमिका पार पाडतात. पक्ष्यामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होते. त्यामुळे वनस्पतींचे सुद्धा संवर्धन होत असते. त्यांच्यामार्फत वनस्पतींचे परागीभवन आणि बीजप्रसार होत असल्याने अनेक झाड आपोआप रुजतात. आपल्या पूर्वजांनी निसर्गातील प्रत्येक घटकाकडे अत्यंत बारकाईने लक्ष पुरविले होते. हे आपणास मंदिर, बारव, लेणी वरील नक्षीकामावरून लक्षात येते. निसर्गातील पक्षी वनस्पती यांची जीवापाड काळजी घेतली होती म्हणून पूर्वीच्या काळातील वातावरण स्वच्छ राहत होते परिसरात येणाऱ्या खंड्या, वेडा राघू, सूर्य पक्षी, कोतवाल, कावळा, चिमणी, कावळा खाटीक, भांगपाडी मैना, चातक, पावशा इत्यादी पक्ष्यांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच आपल्या परिसरात आढळून येणाऱ्या १३६ पक्ष्यांची माहिती असणारे पोस्टर भेट दिले. व्याख्यानंतर विद्यार्थ्यांनी गव्हाणे आणि ढाकणे यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवादही साधला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.निपाणीकर ज्ञानेश्वर यांनी तर आभार प्रदर्शन सोनय्या कीर्तनकार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप काळे, श्री ठोंबरे, श्री.लाड, सुनीता जोशी आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.








