“देशसेवेसाठी एक पाऊल पुढे – आदेश आल्हाट याचा ‘स्नेहबंध’ तर्फे सन्मान”
प्रतिनिधी -सारंग महाजन
अहिल्यानगर – देशसेवा ही सर्वात मोठी सेवा मानून भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या आदेश राजेंद्र आल्हाट यांचा स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या हस्ते त्याचा पुष्पगुच्छ, मेडल देऊन अभिनंदन करण्यात आले. केवळ १८ वर्षे वय असलेला आदेश आल्हाट हा भिंगार स्पोर्ट्स क्लबचा विद्यार्थी असून त्यांनी आतापर्यंतच्या प्रशिक्षणात मेहनत, शिस्त आणि देशप्रेम या मूल्यांना प्राधान्य दिले आहे. आदेश याने आपले बारावी शिक्षण पूर्ण केले असून सध्या नगर कॉलेज, अहिल्यानगर येथे शिक्षण घेत आहेत. तो जामखेड रोड, अहिल्यानगर येथे राहत आहे. या प्रसंगी प्रशिक्षक रिटायर्ड आर्मी विठ्ठल काळे, भिंगार स्पोर्ट्स क्लबचे विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, “देशाच्या संरक्षणासाठी पुढे येणारे तरुण म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाचे प्रेरणास्थान आहेत. आदेश सारखी तरुणाई देशसेवा निवडते तेव्हा राष्ट्राचा अभिमान अधिक उंचावतो. स्नेहबंध फौंडेशनतर्फे आदेशला पुढील सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.” कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भिंगार स्पोर्ट्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी केले तर आभार आदेश आल्हाट यांनी मानले.








