जिल्हा परिषद अकोला मध्ये कमिशनखोरी थांबवा — अन्यथा कार्यकारी अभियंत्यास काळे फासू! — राजेंद्र पातोडे यांचा इशारा
अकोट प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील
अकोला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सुरू असलेल्या प्रचंड कमिशनखोरी व भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने आज तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. “कामवाटपातील भ्रष्टाचार थांबवला नाही, तर कार्यकारी अभियंत्यास काळे फासले जाईल,” असा कठोर इशारा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी दिला.
अकोला येथे जि.प. बांधकाम विभागाच्या कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत युवा आघाडीने विभागातील अनियमिततेचा पर्दाफाश केला. पातोडे यांनी सांगितले की, “कामवाटपात ठराविक ठेकेदारांना प्राधान्य दिले जात असून, यासाठी स्वतंत्र यादी तयार केली गेली आहे. ४ नोव्हेंबर रोजी संविधान भवन येथे झालेल्या कामवाटप समिती सभेत २२ कामे फक्त ३३ लाख रूपयांची दाखवून प्रत्यक्षात तब्बल ७ कोटी ७० लाखांची कामे गुप्तपणे वाटप केली गेली.”
ते पुढे म्हणाले की, अकोट तालुक्यातील रामापुर (धारूळ), अकोली जहाँ, तसेच तेल्हारा तालुक्यातील झरी बाजार, भिली, अडगाव बु. या ग्रामपंचायतींमध्ये विकास कामांसाठी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दिल्यानंतरही टेंडर बुक देण्यास अधिकारी व कर्मचारी आमदारांचे नाव सांगून टाळाटाळ करत आहेत. रामापुर (धारूळ) येथील दोन प्रस्तावित कामांपैकी एका कामाचे टेंडर ठेकेदाराने घेतले, मात्र दुसऱ्या कामासाठी सरपंचला अडवले जात आहे.
या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील वंचित बहुजन युवा आघाडीने भेट देऊन तक्रार केली. “जर तातडीने सुधारणा झाली नाही, तर कार्यकारी अभियंत्यांना काळे फासले जाईल,” असा निर्वाणीचा इशारा राजेंद्र पातोडे यांनी दिला.
यावेळी राजेंद्रभाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, माजी जि.प. सदस्य गोपाल कोल्हे, सचिन शिराळे, जय रामा तायडे, नागेश उमाळे, वैभव खडसे, सुगत डोंगरे, श्रीकृष्ण देवकुणबी, राजदर खान, अमोल डोंगरे, महेंद्र शिरसाट, अमोल वानखडे, अभी वानखडे, मयूर सपकाळ, रवी वानखडे, आकाश शेगोकार, विश्वजीत खंडारे, विजय पातोडे, विकी दांदळे, आकाश जंजाळ, सुरज दामोदर, आकाश गवई, रवि वानखडे आदी उपस्थित होते.








