कामचुकार अधिकाऱ्यामुळे अडले रस्त्याचे काम!
आलेवाडी ग्रामस्थांचा संताप — आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून मंजूर रस्ता थांबला
अकोट प्रतिनिधी – नीलकंठ वसू
आकोट तालुक्यातील आलेवाडी गावात आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या विकासनिधीतून मंजूर करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सहाय्यक अभियंता, मुंडगाव उपकेंद्र यांच्या कामचुकारपणामुळे अडले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी आलेवाडी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष मुंडगाव उपकेंद्र कार्यालयात भेट देऊन लेखी अर्ज सादर केला होता. अकोटवरून आलेली मुख्य विद्युत लाईन ही रस्त्याच्या मध्यभागातून गेल्याने रस्ता बांधकामात अडथळा येत आहे. ग्रामस्थांनी त्या लाईनचे खांब व ताण बाजूस हलवावेत अशी विनंती केली होती.
तथापि, सहाय्यक अभियंता यांनी गेल्या 30 ते 40 दिवसांपासून कोणतीही कारवाई केली नाही. फोनवरही ग्रामस्थांनी वारंवार संपर्क साधला, तरीही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावातील नागरिक म्हणतात, “जर त्या खांबांचा ताण बाजूला घेतला असता, तर आज आमचा रस्ता पूर्ण झाला असता. पण अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे काम अडकले आहे.”
ग्रामस्थांनी आता आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे थेट तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, मुंडगाव उपकेंद्रातील उदासीन सहाय्यक अभियंता यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.








