अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ग्रामीण भागातील रस्ते व इमारतींच्या कामात तडजोड नाही
– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
प्रतिनिधी सतीश कडू
नागपूर,दि. 8 : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत होणाऱ्या रस्ते व इमारतीच्या बांधकामाची गुणवत्ता अधिकाधिक उत्तम व भक्कम असली पाहिजे. यासाठी संबंधित क्षेत्रातील कनिष्ठ अभियंत्यांपासून उप अभियंत्यांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात फिरतांना जनता जेथे वाईट कामे झाली आहेत त्याची थेट तक्रार करतात हे संबंधित विभागांनी लक्षात घेतले पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक सर्कलनिहाय झालेल्या कामांपैकी किमान पाच कामे तपासण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
आज जिल्हा नियोजन सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच विविध कार्यकारी यंत्रणांचा जिल्हास्तरीय आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, पोलीस उपायुक्त नचिकेत कदम, डॉ. अश्विनी पाटील, मुख्य अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता सर्वश्री पराग थमके, निशिकांत राऊत, श्रीमती वंदना ईखार तसेच संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पारशिवनी तालुक्यातील कन्हान नदीवर दहेगाव जोशी ते ईसापूर रोड येथील पुलाचे बांधकामाबाबत आढावा घेण्यात आला. बांधकाम मर्यादेत व्हावीत, मुख्य अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या बैठकीत सर्वांसाठी घरे योजना, पट्टे वाटप, कळमना पोलीस स्टेशन जागा याविषयावर आढावा घेण्यात आला.
सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत मौदा, कामठी व नागपूर ( ग्रामीण )तालुक्यातील पट्टे वाटप योजनेसाठी ज्यांना घरे नाहीत अशा व्यक्तींबाबत वस्तुस्थितीदर्शक माहिती असली पाहिजे. सर्वांसाठी घरे योजनेसाठी ग्रामसेवक व तलाठी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या प्रत्येक गावात जाऊन सर्व्हे करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. पोलीस स्टेशन कळमनासाठी जागा उपलब्ध करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. याबाबत नागपूर सुधार प्रन्यासने निर्णय घ्यावा असे ठरले.
