अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ताबडतोब करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन
मानवत / वार्ताहर.
—————————
पावसाच्या खंडानंतर झालेल्या पावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर 36-48 तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.
तरी व.ना.म.कृ.वि.यांच्या शिफारशी नुसार, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मानवत यांच्यातर्फे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, अकस्मिक मर साठी खालील व्यवस्थापन करण्यात यावे.
*आकस्मिक मर व्यवस्थापन*:
*अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करवा.
*वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.
*त्वरित 200 ग्रॅम युरिया 100 ग्रॅम पांढरा पोटॅश (00:00:50 खत) + 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी.”
किंवा 1 किलो 13:00:45 + 2 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + 250 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड 200 लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली आळवणी करावी. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने त्वरित दाबून घ्यावी. वरील सर्व ‘उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच त्वरित म्हणजे 24 ते 48 तासाच्या आत कराव्यात जेणेकरून प्रभावी व्यवस्थापन होण्यास मदत होते.
तरी तालूक्यातील शेतकरी बांधवांनी मर याचे व्यवस्थापण करावे असे आवाहन मानवत तालूका कृषि अधिकारी
श्री. जी.ए. कोरेवाड यांनी केले आहे.
