अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
गडचिरोली-अहेरी बस गट्टा येथे बंद पडली; प्रवाशांना मोठ्या गैरसोय
प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा: प्रशांत पेदापल्लीवार
गडचिरोली :- गडचिरोली ते पेंढरी, अहेरी मार्गावर धावणारी एस.टी. बस आज सकाळी मौजा गट्टा येथे अचानक खराब झाली. या घटनेमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागले. सकाळपासून गडचिरोली वरून अहेरीकडे प्रवास करणारे प्रवासी गट्टा येथे अडकून बसले असून, दुसऱ्या बसची प्रतिक्षा करावी लागत आहे.
प्रवाशांचे म्हणणे आहे की, शासनाकडून अतिदुर्गम भागात चांगल्या व सक्षम बसेस पाठवण्याऐवजी जुन्या व खराब बसच धाडल्या जातात. परिणामी अशा अपघातासदृश्य परिस्थिती वारंवार उद्भवत आहे.
दरम्यान, पावसाळा सुरू असल्याने या मार्गावरील रस्ते आधीच चिखलमय व खराब अवस्थेत आहेत. रस्त्याची रुंदी कमी असल्याने अनेक वाहनं रस्त्यातच अडकून बसतात. अशा परिस्थितीत बस बंद पडल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक प्रवाश्यांनी व नागरिकांनी शासन व एस.टी. महामंडळ प्रशासनाकडे तात्काळ योग्य बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी रोज या मार्गाने प्रवास करतात. अशा वेळी रस्त्यात बस बंद पडल्यास शिक्षण व कामकाजावर थेट परिणाम होतो, तसेच आर्थिक व मानसिक नुकसानीलाही सामोरे जावे लागते, अशी नाराजी प्रवाश्यांकडून व्यक्त होत आहे.
प्रशासनाने या बाबी गांभीर्याने घेत तातडीने सुधारणा करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी करत आहेत
