अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मंगरूळमध्ये गटार व घनकचरा घोटाळ्याची चौकशी दडपली!
अहवाल का गायब? दोषींना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा संभाजी ब्रिगेडचा आरोप
प्रतिनिधी .नामदेव मंडपे मंठा
मंठा तालुक्यातील मंगरूळ गावातील 15 वा वित्त आयोग 2023-24 व 2025-26 तसेच स्वच्छ भारत मिशन 2021-22 टप्पा 2 अंतर्गत मंजूर झालेल्या भूमिगत गटार बांधकाम आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारींवर चौकशी झाली असली तरी अद्याप त्याचा अहवाल पंचायत समितीकडे सादर झालेला नाही.
सदर चौकशीची मागणी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खवणे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीनंतर पंचायत समिती मंठाने गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, उप अभियंता (पाणीपुरवठा परतूर) आणि बी.आ. अधिकारी यांचे पथक नेमून चौकशीचे आदेश दिले होते. हे पथक दिनांक 29 जुलै 2025 रोजी मंगरूळ येथे दाखल झाले होते.
चौकशीदरम्यान सादर केलेल्या पुराव्यांतून निकृष्ट दर्जाचा बांधकाम साहित्य वापर, अपूर्ण कामे, निधीचा अपव्यय आणि मोजमापातील अनियमितता यासारखे मुद्दे समोर आले होते. अधिकारी पथकाने कामांची पाहणी करून पंचनामा देखील केला होता.
मात्र, चौकशी पूर्ण होऊनही जवळपास तीन आठवडे उलटले असतानाही पंचायत समितीकडे सविस्तर अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे हा अहवाल दडपला जात असल्याची चर्चा सुरू असून, या प्रकरणात दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या संदर्भात संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष बाळासाहेब खवणे यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
