अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
२५ ऑगस्टला नागपूरमध्ये कंत्राटदारांचे ‘भिकमांगो आंदोलन’
थकीत देयकांसाठी विदर्भातील कंत्राटदार आक्रमक – मुख्य अभियंता कार्यालयासमोर उभारणार आंदोलन
मनोज उराडे जिल्हा प्रतिनिधी – अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली
गडचिरोली :सार्वजनिक बांधकाम विभागाने (सा.बा.) कंत्राटदारांचे थकीत देयके न सोडल्यामुळे आता विदर्भातील कंत्राटदार आक्रमक झाले आहेत. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नागपूर येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर कंत्राटदार मोठ्या संख्येने ‘भिकमांगो आंदोलन’ उभारणार असल्याचा निर्णय गडचिरोली येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष नितीन डहाके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रवीण उंबरकर (यवतमाळ), किशोर मिटकरी (वर्धा) तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कंत्राटदारांच्या प्रमुख मागण्या :
* थकीत देयके तातडीने मंजूर करून वितरीत करावीत.
* जुन्या देयकांची थकबाकी निकाली न काढता नवी निविदा काढू नये.
* शासनाने पुढील १० दिवसांत निधी उपलब्ध करून द्यावा.
कंत्राटदारांचा आरोप आहे की मार्च २०२५ मध्ये फक्त ५% इतकाच निधी वितरित करण्यात आला असून त्यानंतर आजतागायत एकही रुपया मिळालेला नाही.अनेक निवेदनं, आंदोलनं करूनही शासनाने ठोस उपाययोजना केली नसल्याने कंत्राटदारांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. या आंदोलनात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, गोंदिया, भंडारा, अमरावती, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेकडो कंत्राटदारांचा सहभाग अपेक्षित आहे. “आता तरी शासनाने कंत्राटदारांना न्याय द्यावा, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल,” असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.”
